Monday 19 August 2013

जन्म कवितेचा, जन्म भावनेचा 
रंगात रंगणारा जैसा मास श्रावणाचा 

जन्म कवितेचा, जन्म भावनेचा 
गंधात गुंफणारा जैसा मार्ग भ्रमराचा 

जन्म कवितेचा, जन्म भावनेचा 
निःशब्द लाभणारा जैसा स्पर्श सावलीचा 

जन्म कवितेचा, जन्म भावनेचा 
स्वरात रमणारा जैसा नाद पर्णांचा 

जन्म कवितेचा, जन्म भावनेचा 
रात्रीस भिजणारा जैसा चंद्र चांदण्यांचा 

जन्म कवितेचा, जन्म भावनेचा 
रक्तात भिनणारा जैसा स्वाद केशराचा 

जन्म कवितेचा, जन्म भावनेचा 
श्वासात रुजणारा जैसा गंध केवड्याचा 

जन्म कवितेचा, जन्म भावनेचा 
एकाकी थांबणारा जैसा थेंब आसवाचा 

जन्म कवितेचा, जन्म भावनेचा 
ह्रदयात गंजणारा जैसा भाव प्रियकाचा 

अन् 

जन्म कवितेचा, जन्म भावनेचा 
स्मरणात गुंगणारा जैसा क्रंद माणसाचा  


Wednesday 14 August 2013

असेन मी नसेन मी 
परि असेल माझे गीत सारे 
काळजाच्या अंतरंगी 
तव स्मृतींचे शब्द किनारे 

जे सरले आता पडले मागे 
उरले तयात मी न माझे 
शब्द शब्द परि वेचणारे 
अखेर सोबतीस गीत माझे 

गीत म्हणो वा काव्य तयाला 
ओठी जयातून शब्द निघाला 
शब्दाने शब्द कधी पेटलेले 
हे असेच सोबती कधी भेटलेले…