Thursday 26 May 2011

गुंत्यातून सुटले मुक्त तिचे पाय 
ओल्या ओंझळीत मी टिपावे काय ?
लळा मजसी जणू मऊ दाट साय 
अशीच काही भोळी होती माझी माय..... 
मनी असे अपुरा पितृ जिव्हाळा 
जखमी काळजास साहिल्या कळा 
मजसी उरे ना मजवर ताबा 
दूरच्या देशी निघून गेले बाबा..... 

मना स्मरे मी पहिली भेट आपुली 
ही अशीच होती काही सांज सावळी
मना लागते तुझी ओढ पुन्हा सारखी 
मी वाट पाहे तुझी त्या गुलमोहरा तळी.... 

अजुनी चंद्रासी रात्र सावरे 
उरात चांदणे नभा मंडपी 
गूढ मनीचे रात आवरे
गाली हसुनी पहाट-रजनी.....  
पूर्व दिशी फुटले तांबडे 
देऊन हलकी जाग नयनी 
परसात केशरी उन सांडले 
घेऊन प्राजक्त सडा अंगणी....  
नकळत सारे आभाळ भरले 
चोही दाटला गडद रंग 
हलक्या पावलांनी थेंब उतरले 
क्षणा चेतुनी माती अंग....  
केसातून सांडला जाई गजरा 
ओठी तुझ्या तृप्त गात्र 
बहु दिसात लाभे मजला 
अशी रसिली मिलन रात्र.... 
रंगात रंगुनी रंगवेल रंग
नटखट कृष्ण मुरारी
रास मांडशी गवळणी संग 
यमुना काठी दुपारी.... 
पाऊल टाकीत इवली 
गेलास निघून चंचले 
विरहात चिंब भिजोनी 
मन अंतरात गंजले.....
सरले जीवन स्मरणात तुझ्या 
आता तरी येशील का ?
राख रांगोळी देहाची माझ्या 
करी उचलोनी घेशील का ?...
येईना अश्रू तुझिया डोळा 
म्हणून देवास लेणं मागतो 
मम सुखाची तुजला छाया 
तव दुःख मी पाझरतो.....
अजुनी श्वासात दरवळे गंध अत्तराचा 
लाजुनी झुके खाली तव देठ केवड्याचा 
ओठास केशरी रंग अजुनी त्या विड्याचा
मनी उमटे अजुनी तो सडा चांदण्यांचा...  
सहज बरसल्या अश्रुधारा 
गाली सुकले मीठ डोळा
मनी घुमतो आकांत एवढा 
मज भाळी जळता सोहळा....
मना छेडीसी नाव कुणाचे ?
ते तर निव्वळ थेंब दवाचे 
पडता तयासी उन दाहले 
उरते केवळ डाग नव्याने....
गर्द फुलोरा उमलला छान 
कोणी ऐसा मयूर शान ?
काल ऐकोनी तयाचे गान 
करी झेलले पिंपळ पान....  

Wednesday 25 May 2011

ऋतू कोवळे संचिताचे 
फुल नाचते बाग बहरे
वसंत मनी झुलवी झुले
परि का प्रेमास वंचित असे ?  
पुन्हा जाहली संद्याकाळ 
निळे, गर्द, मुक्त, आभाळ 
तो हळवा, गोल, गोड, कोवळा 
मजसी भासे जणू मेघ सावळा....
कोणास घाली साद चिमणा ?
तो दूर लोटुनी निघोनी गेला 
आत पेटवे याद वणवा 
दावूनी अंगी चंदनी शेला....   
औदास्य मना तुज कोण सावरे ?
ग्लानी डोळा ढळे अश्रू नाचरे 
रोमांच पर्व तुज मन बावरे 
साचे ह्रिदयी तव दुःख ना आवरे.... 
नभ चिंब परि देह कोरडा 
असंख्य अनावर उरी वेदना 
जगास पाही कोण ऐसा ?
मज सारखा प्रेम-दिवाणा.... 
वेचिले जीवन ज्याच्या आठवणीत 
तो क्षण जळाला होऊनी सांजदीप 
देह-राख उरे सुखाच्या सावलीत 
परि ओठी आले त्याचे जीवनगीत.... 
जाता जाता काही लिहून जावे 
जाता जाता काही देऊन जावे 
डोळा साचणाऱ्या अश्रुंसामावेत 
मग अपुरे चांदणे न्हाहून जावे.... 
प्रेम-स्पर्श गोड जयाचा
आसमंत गंध जयाचा
खुद्द बहरला कुंज जयाचा
मन-मोगरा जळे  तयाचा.... 

लागले ग्रहण का प्रेमास ?
जाहले वेडे तुझे आभास 
कुरावळशील  का त्या मनास ?
सोडून जाता मी या जगास.....

प्रीत माझी फुलते ज्यासी 
झाले त्याला मी नकोशी 

प्रीतीचा हा सरता रंग
तव प्रेमाचा अपुरा संग 
बाळगे जखमा मी उराशी

तुज सांगू  कसे मना रे ?
आत मनाच्या पेटती निखारे 
देह पाही जाळू मरणासी 

मना रेखिले चित्र देखणे 
तुज जीवनाला अमृत प्याले 
सोशीत नाहक थेंब विषारी 

झाले त्याला मी नकोशी....
रम्य सांजवेळी मज बाहूत एक प्याला
होवुनी तयास ठिपका मम चांदवा जाळला

गोंजारलेल्या त्या हळुवार गोड क्षणांना
अजुनी भासे स्पर्श मम गंधही तयाचा

कसे भुलवावे त्या मंद आसवांना ?
जखमा उरातल्या कोणास त्या कळाव्या ?  

अपुरे राहिले स्वप्न माझे, अपुर्या माझ्या भावना 
अशा रम्य सांजवेळी मज बाहूत एक प्याला.....

माझीच एकटी मी असते कधी कधी
माझीच एकटी मी हसते कधी कधी

सोडून जाता घरटे मन राहणार मागे
सरत्या आठवणींचा बाग जळणार मागे
आरश्यास बिंब माझे नसते कधी कधी

 रेखीव चित्रे मम डोळा साचले मागे 
कोमेजला गुलाब तव काटे मज रुते 
विझला चांदवा तारे रुसते कधी कधी 

स्पर्शाने खुलला जो गंध उरे आता मागे
मज रेशमाचे बंध तुटती आत धागे 
मनी गोड आठवा फसते कधी कधी 

माझीच एकटी मी असते कधी कधी......

जीवनात असावे टिपूर चांदणे 
नको नुसती छाया
प्रेम-धागे पक्के बांधणे
नको नुसती माया

जीवनात असावे टिपूर चांदणे
नको नुसते गाणे
गाण्याला तरल भाव असावा
नको व्यर्थ तराणे

जीवनात असावे टिपूर चांदणे
असाव्या जळत्या वाती 
प्रेम तयावर खूप करावे 
नको पोकळ नाती.....
नकळत सारे घडले 

कधी बहरले, कधी रुजविले 
स्वप्नांचे वाटे, नकळत सारे घडले

कधी न कळले,कधी उमगले 
नयनी माझ्या मेघ दाटले 
नकळत सारे घडले 

कधी न कळले, कधी तुटले 
आशेचे मम टिपूर तारे
नकळत सारे घडले

कधी न कळले, कधी कातरले
मम सुखाचे रेशीम धागे
नकळतच सारे घडले....

मीरेचे मुके व्रत कान्ह्याशी बोलते 
निःशब्दाचे वेड तिचे कान्ह्यालाच कळते 

कान्ह्याचे स्वप्न आशेने फुलते 
कान्ह्याचे सत्य मीरेला वेडावते 

मीरेचे दुःख कान्ह्याला रडवते 
मीरेपाशी बोलताना कान्ह्याला दुःखावते

कान्ह्याचे सूर मीरेला हसवते 
मीरेचे गाणे कान्ह्याला बोलावते 

कान्ह्याची कहाणी मीरेला रुसवते 
मीरेची भावना अश्रूतून ओघळते....

गावामधून वळून जरा 
वाट निघाली तरा तरा

निघे कशी भर भर 
गावाबाहेर आल्यावर 

तशीच निघाली सर सर 
येऊन थांबली नदीवर 

पाण्यामध्ये टाकला पाय 
पुढे काय ? पुढे काय ?

वाट म्हणाली " त्यात काय ?"
पुढच्या काठावर उमटले पाय...


मन खुळे मन चिंब 
मन आरश्याचे बिंब 

डोळ्यांमध्ये रंगवते 
स्वप्न काही जागवते 

मनामध्ये धुंदावते 
श्वासामध्ये गांधावते 

एकदाच आभाळाला
माती बोलावते....
कधी वाटते क्षितिजावर जावे
मेघांच्या जोडीने शांत बरसावे 

कधी वाटते खालती यावे 
जल्बिन्दुन्सोबत मातीत रुजावे 

कधी वाटते हवेत तरंगावे 
वार्यासारखे बेभान व्हावे 

कधी वाटते सूर्य व्हावे 
सर्वांना सहस्त्र जीवन द्यावे

कधी वाटते आकाश व्हावे
पृथ्वीभोवती अथांग पसरावे

कधी वाटते पक्षी व्हावे
खुल्या आभाळात भिरक्या घ्यावे

अन, 
कधी वाटते माणूस व्हावे
वेड्या मनावर प्रेम करावे....
बसलो असता मी बागेत 
आला होता क्षुब्द वात...

उडवून नेले सर्व पाचोळा
येऊन हाय शुद्र वारा... 

दिले भिरकावून कुणीकडे ?
कोणास ठावूक कोठे नेले ?

दूर लांब कोठेतरी
जात जेथे कोणी नाही...

जेथे गडद काळोख
नाही कुणाची ओळख...

अश्या ठिकाणी तो पाचोळा
दूर एकदा पडला असता...

जीर्ण झाला, विरून गेला 
मातीमोल झाला, नवे आयुष्य जगाया...



जोडून व्यर्थ नाती बेचैन श्वास झाला 
येता क्षणैक डोळा तो थेंब  आसवाचा...

जाणीव ती जळाली होवून सांजवाती 
आभास बोचले ते येवून चांदराती...

ओसाड माळरानी कोठून गंध आला?
गंधात गुंतताना कोणी निघून गेला...

का एकले पणाची हुरहूर काळजाला?
जोडून व्यर्थ नाती बेचैन श्वास झाला...