Friday, 26 October 2012

     तो काही न बोलताच बरेच काही बोलून गेला. मी मात्र त्याच्या एक एक शब्दाला आसुसले होते. असे म्हणतात कि जो पर्यंत आपण काही गमावत नाही त्याची किंमत आपल्याला काळात नाही; पण हे हि तितकेच खरे कि जो पर्यंत आपण काही मिळवत नाही तो पर्यंत आपण काय हरवून बसलो होतो याचा अंदाज देखील येत नाही. तो असाच काहीसा वेड लावणारा, मंत्र मुग्ध करणारा होता.

     असो, त्याच्या सोबतीचे सर्व क्षण जपून ठेवले आहेत. पूर्वी केव्हा कधी केसात माळलेला गजरा तो हलक्या हाताने काढायचा तेव्हा अंग-अंगी रोमांच उभे राहायचे, आणि आता तसाच गजरा कोमेजून जाई पर्यंत जरी ठेवला तरी त्या वेड्याचा स्पर्श देखील होत नाही.

     आता त्याला भेटण्यासाठी त्याच्या आठवणीतच रुळावे लागते. खरच त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हो हा सन्मान !!

Tuesday, 18 September 2012

     आपण निसर्गापासून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. असेच काहीसे माणूस आणि झाडाचे नाते असावे. माणसानं झाडासारखं असण्याचा केव्हातरी प्रयत्न करावा. कितीही उंच प्रगती केली तरी मुळं जमिनीत खोलवर रुजलेली. सर्वत्र पसरलेल्या फांद्या म्हणजे माणसाचे कर्तृत्व किंवा विचार क्षमता. त्या किती, कुठे वाढतील याचा काही नेम नाही. किती तरी वेळा त्या अनेक कारणास्तव छाटल्या जातात, तरी न खचता त्या वारंवार वाढतच राहतात. आपल्याला किती इजा होईल ह्याची परवा न करता हे झाड सदा वाढतच जातं व बहरतं. अर्थातच त्याला तसं मायेचं खत-पाणी व उब देखील लागतेच ना !!

     असो, एवढे असूनही हे झाड कधी कोणाला दुखावत नाही किंवा त्रासही देत नाही. किंबहुना सर्वांना संतुष्ट ठेवण्याचाच प्रयत्न असतो. हे झाड आशेचं एक जिवंत उदाहरण म्हणूनच, "वृक्षवल्ली आम्हा सोयरी" असे म्हटले असावे. 


     असेच माणसाने केव्हातरी होऊन पहावे, फक्त केव्हातरी एकदा.....

Saturday, 8 September 2012

     तो निघून गेला. सर्व काही घेऊन गेला. माझ्या पास उरला फक्त त्याने दिलेला शेला. अनेक रंगांनी भरलेला, आठवणींच्या धाग्यांनी विणलेला हा शेला. त्यात सर्व रंगांचे धागे विणले, प्रत्येक धाग्याची एक आठवण. मग ते हसू असो व आसू असोत. मात्र त्यात एक प्रेम रंग जोडायचाच राहून गेला.

     असो, त्याचा गुंडा कुठेतरी कोपऱ्यात राखून ठेवला आहे. पुढे केव्हा हा शेला उसला असता त्या प्रेम धाग्याची ठिगळ लावीन. असा हा त्याने दिलेला शेला मनाच्या कोनाड्यात जपून ठेवला आहे. कधी त्या वेड्याची आठवण झाली कि माझी मीच तो शेला मनावर पांघरून अश्रू टिपून घेते.

     असा हा एक शेला, आठवणींचा शेला........  

Sunday, 26 August 2012

मी न ह्या जगाचा
नाही मी त्या जगाचा 
माझी न काही ओळख 
मी एकल्या मनाचा

दिवसा मागून रात 
उरते जशी उरात 
माझ्या मनातील रात 
भिजते तशी विरहात 
कोणास चांदण्या ह्या ?
माझी न काही ओळख 
मी एकल्या मनाचा 

देऊन जा जरासा 
तो स्पर्श आठवाचा 
घेऊन जा जरासा 
तो थेंब आसवाचा 
कोणी न सावराया 
माझी न काही ओळख 
मी एकल्या मनाचा ......

Sunday, 29 July 2012

मम आठवणींची भेळ हवी !
त्यास प्रेम-स्पर्शाची मेळ हवी ! 
परि प्रेम अंगी जपताना 
रंगण्यास निवांत वेळ हवी ! 

Tuesday, 24 July 2012

साँवरे कृष्ण मुरारी मन मोह लियो रे 
मीरा प्रेम दिवानी हरि नाम गवायो रे 


बाँधे पग में घूँगर चलत हरि की दासी 
प्रेम निराला एसा जगत ना देखा कोई 
रंगायो रंग में कान्हा रास रचायो रे 


मीरा के प्रभू गिरिधर नंद मुरारी 
नाम जपत प्रभूजी संसार बिसराई 
सखी मगन एसो जोगन बनायो रे.....

Saturday, 7 July 2012

माझीच मी उरले तशी 
रात्रीस वाट उरते जशी 


केसातून विरला जाईचा गंध 
सरला गुलाबी गुलजार रंग 
निमिषात मी उरले तशी 
मेघात वीज उरते जशी 


कोणास चाहूल श्याम पावलांची ?
कोणास रात्र चिंब पावसाची ?
जोगीण मी उरले तशी 
कान्ह्यास मीरा उरते  जशी.....